पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून लंडन येथे पोहोचले आहेत. खरे तर पंतप्रधान मोदींचा हा ब्रिटन दौरा विशेष असणार आहे. या दौऱ्या दरम्यान, भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक संबंधांना नवीन आयाम मिळणार आहेत. भारत आणि ब्रिटन आज लंडनमध्ये मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी करणार आहेत. यामुळे अनेक उत्पादनांची आयात आणि निर्यात स्वस्त होईल.
पंतप्रधान मोदी म्हणाले, या भेटीदरम्यान ते ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टारमर (keir starmer) आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतील. या दरम्यान, दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाईल.
पंतप्रधान मोदी आणि केअर स्टारमर एफटीएवर स्वाक्षरी करतील -भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) 2030 पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट करून 120 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांच्या उपस्थितीत व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली जाईल.
या वस्तू स्वस्त होतील आणि कर कमी होईल -भारत-ब्रिटन करारानंतर, चामडे, शूज, ऑटो पार्ट्स, सीफूड, खेळणी आणि कपडे यांची किफायतशीर दरात निर्यात शक्य होईल, यामुळे, ब्रिटनमधील लोकांसाठी या गोष्टी स्वस्त होतील. याच बरोबर, ब्रिटनमधून येणाऱ्या वस्तूंची आयात देखील स्वस्त होईल, यामुळे भारतीयांनाही स्वस्त दरात वस्तू मिळतील. यांत, व्हिस्की, चॉकलेट, बिस्किटे, सॅल्मन मासे, कॉस्मेटिक वस्तू, वैद्यकीय उत्पादने आणि लक्झरीअस कारचा समावेश असेल.
करार अंमलात येण्यासाठी लागू शकतो एक वर्षाचा कालावधी -वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष जोनाथन रेनॉल्ड्स करारावर स्वाक्षरी करतील. करार अंमलात येण्यापूर्वी त्याला ब्रिटिश संसदेची मान्यता आवश्यक असेल. या प्रक्रियेला सुमारे एक वर्ष लागू शकते. ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी, मालदीवला रवाना होणार आहेत.