नवी दिल्ली : दिल्लीच्या मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाशी आमचा समझोता होणार नाही, असे काँग्रेसतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे दिल्लीत सर्वत्र भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्ष असे तिरंगी सामने होतील. काँग्रेस आपले उमेदवार १४ एप्रिल रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसशी समझोता करण्याची इच्छा व तयारी दर्शवतानाच, हरयाणा व पंजाबमध्येही आपण जागावाटप करावे, अशी अट घातली होती. त्यास हरयाणा व पंजाबमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने आपची मागणी अमान्य केली. आम आदमी पक्ष दिल्लीतील तीन जागा आमच्यासाठी सोडणार असेल, तर आजची आमची आपशी समझोत्याची तयारी आहे, असे काँग्रेसचे नेते पी. सी. चॅको यांनी सांगितले. दिल्लीत दोन्ही पक्षांत जागावाटप शेवटच्या टप्प्यात असतानाच आपने हरयाणा व पंजाबमध्येही आघाडीची अट ठेवली. त्यामुळे संपूर्ण समझोताच फिसकटला. चॅको म्हणाले की, २0१४ साली आम्हाला दिल्लीत २६ टक्के, तर आपला २१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांची मते ४७ टक्के होती. या स्थितीत आपने आम्हाला किमान तीन जागा सोडणे अपेक्षित होते. तसे होणार असेल तर आजही आम्ही तयार आहोत.