दिल्ली विधानसभेत भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारी सभागृहाचा पहिला दिवस होता. सुरुवातीच्या कामकाजानंतर, विधानसभेचा पहिला दिवस गोंधळातच सुरू झाला. आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर मुख्यमंत्री कार्यालयातून भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढून पंतप्रधान मोदींचा फोटो बसवल्याचा आरोप केला. 'आप'च्या आरोपांनंतर, भाजपने फोटो वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाने फोटो प्रसिद्ध करत म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो अबाधित आहेत, यासोबतच हे तीन नवीन फोटो देखील जोडले आहेत. या मुद्द्यावर भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सर्वांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…
मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ. आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो काढून टाकल्याच्या आम आदमी पक्षाच्या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या दिल्ली युनिटने सोशल मीडियावर एक फोटो प्रसिद्ध केला आणि म्हटले की, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि सर्व मंत्र्यांच्या खोलीत महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह, महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
डॉ. आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो काढून टाकल्याच्या आम आदमी पक्षाच्या आरोपांना भाजपचे आयटी सेल प्रभारी अमित मालवीय यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून फोटो प्रसिद्ध केला आणि लिहिले की, "ही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची खोली आहे, तिथे आजही सर्व महापुरुषांचे फोटो आहेत. मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकत नाहीत, म्हणून ते गोंधळ पसरवण्याचे स्वस्त राजकारण करत आहेत. जनतेने त्यांना इतके अपमानित केले की पराभवानंतर ते तोंडही दाखवू शकले नाहीत, असा टोलाही लगावला.
सोमवारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, आम आदमी पक्षाच्या आमदारांसह, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. दिल्लीतील महिला समृद्धी योजनेवरील चर्चेनंतर, आतिशी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्या आणि विधानसभेत पोहोचल्या यावेळी गोंधळ सुरू झाला. मुख्यमंत्री कार्यालयातून भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याचा आरोप आतिशी यांनी केला. या आरोपांनंतर विधानसभेत गोंधळ उडाला आणि सभापती विजेंद्र गुप्ता यांनी कामकाज तहकूब केले.