काँग्रेस नेते उदित राज यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची तुलना थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. भागीदारी न्याय सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, ते इतर मागासवर्गाने (OBC) एकले, तर ते (राहुल गांधी) त्यांच्यासाठी 'दुसरे आंबेडकर' सिद्ध होतील. ओबीसी वर्गाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे समर्थन करायला हवे, असे उदित राज यांनी म्हटले आहे.
उदित राज म्हणाले, "तेलंगणातील जातीय जनगणना ही समाजाचा एक्स-रे आहे. ती संपूर्ण देशात लागू करण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे. त्यांचे विचार दूरदर्शी आहेत. जर दलित आणि मागासवर्ग पुढे आला तर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. समाजात असलेली असमानता कमी होईल. राहुल गांधींनी काय म्हटले? हे ओबीसींना समजले, तर ते त्यांच्यासाठी दुसरे आंबेडकर ठरतील.'
उदित राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "ओबीसी समाजाला विचार करावा लागेल की, इतिहास वारंवार प्रगतीची संधी देत नाही. त्यांनी तालकटोरा स्टेडियम वर झालेल्या सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, त्याचे अनुसरण करावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा. जर त्यांनी असे केले तर राहुल गांधी त्यांच्यासाठी दुसरे आंबेडकर ठरतील." राहुल गांधी शुक्रवारी म्हणाले होते की, आपला पक्ष सत्तेत असताना जातीय जनगणना न करणे ही आपली चूक होती, परंतु आता आपण ही चूक सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. जातीय जनगणनेचा मुद्दा हा एक राजकीय भूकंप आहे, यामुळे देशाच्या राजकारणाला हादरा बसेल.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी? -राजधानी दिल्लीत आयोजित भागीदारी न्याय महासम्मेलनात' बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, "माझा उद्देश देशातील उत्पादक शक्तीला सन्मान मिळवून देणे आहे. ओबीसी, दलित, आदिवासी हे देशाची उत्पादक शक्ती आहे. मात्र, त्यांना आपल्या श्रमाचे फळ मिळत नाहीये. जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला एका गोष्टीची कमतरता जाणवते. ती चूक म्हणजे मी ओबीसी वर्गाचे संरक्षण जसे करायला हवे होते, तसे करू शकलो नाही. मला वाईट वाटते की, जर मला आपल्या इतिहासाबद्दल थोडी अधिक माहिती असती, तर मी तेव्हाच त्याचे समाधान केले असते. मी व्यासपीठावरून हे सांगत आहे की, ही माझी चूक आहे. ही काँग्रेस पक्षाची नाही तर माझी चूक आहे. मी ती दुरुस्त करणार आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की, जर मी तेव्हा जातीय जनगणना केली असती, तर आता ती ज्या पद्धतीने करायची आहे, तशी झाली नसती."