आज श्रीनगर विमानतळावर एका लष्कराच्या अधिकाऱ्याने स्पेसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेत एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. या घटनेवर आता भारतीय लष्कराने त्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई केल्याचे समोर आले. याबाबत लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने विमानात चढण्यापूर्वी जास्त वजनाच्या बॅगांसाठी पैसे देण्यास नकार दिला, त्यानंतर वाद वाढला. त्या अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना २६ जुलै रोजी श्रीनगर विमानतळावर घडली. अधिकारी दिल्लीला जाणाऱ्या विमानात चढणार होते आणि त्याच्याकडे १६ किलो वजनाच्या दोन बॅगा होत्या, असं स्पाईसजेटने सांगितले.
लष्कराने या प्रकरणाची दखल घेतली
आता भारतीय लष्कराने या प्रकरणाची दखल घेतली आहे. लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे आणि तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
लष्कराचे निवेदन
"सेना शिस्त आणि वर्तनाचे सर्वोच्च मानक राखण्यास वचनबद्ध आहे आणि सर्व आरोप गांभीर्याने घेते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे", असं लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.