डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी टेरिफ वॉर, घुसखोरांवरून वादग्रस्त भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांनाही त्यांनी कठोर नियमावली लागू करण्याचे व त्यांना रोखण्याची तयारी सुरु केली आहे. यात भारताविरोधातही भूमिका आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी भारतानेही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून भारत चीनसोबत रणनिती आखण्याच्या तयारी लागला आहे.
चीन आणि अमेरिकेत ट्रेड वॉरमुळे आधीपासूनच संबंध ताणले गेलेले आहेत. याला ट्रम्पनीच पहिल्या कार्यकाळात सुरुवात केली होती. आता त्याचा दुसरा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. युरोपनेही याचा धसका घेतला असून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प शपथ घेण्यापूर्वीच आपली शस्त्रांची ताकद वाढवावी लागेल असा इशारा युरोपिय देशांना दिला आहे. ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाता येईल याची मोर्चेबांधणी मोदी सरकारने सुरु केली आहे. भारत आणि चीनमधील परराष्ट्र सचिव-उपमंत्री यंत्रणेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २६-२७ जानेवारी रोजी बिजिंगला जाणार आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची बिजिंगला भेट घेतली होती. पाच वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चीनसोबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे अमेरिकेविरोधात भारत, चीन काही व्यापारी भिंत उभारू शकतात का, याचीही चाचपणी केली जाणार आहे.