प्रयागराज - उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथं कार चालवताना चालकाचा अचानक मृत्यू झाला आहे. या कारचालकाच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं बोललं जातं. घरातून ऑफिससाठी निघालेल्या या व्यक्तीनं रस्त्यातच जीव सोडला. कार चालवताना अचानक काय घडलं हे कळालेच नाही. तब्येत बिघडू लागल्याने त्याने कार बाजूला घेतली, काही वेळ ड्रायव्हिंग शीटवरच बसला आणि तिथेच त्याचा प्राण गेला.
स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. तिथे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. या व्यक्तीचा कारमध्ये मृत्यू कुठल्या कारणाने झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर इथं राहणाऱ्या प्रमोद यादव हे प्रयागराजच्या गंगापार हंडिया या सार्वजनिक आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. झूसीच्या मुंशी इथं त्यांनी खोली भाड्याने घेतली होती. नेहमीप्रमाणे प्रमोद कार घेऊन ऑफिसला निघाले. कार झूंसी-सोनौटी रस्त्यावर पोहचली तेव्हा अचानक त्यांची तब्येत ढासळली, भीती वाटू लागली. ज्यामुळे प्रमोद यांनी कार बाजूला घेतली. फूटपाथवरून जाणाऱ्या काही लोकांनी हे पाहिले. त्यांना सर्वकाही नॉर्मल वाटले. परंतु खूप वेळ प्रमोद ड्रायव्हिंग शीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळले तेव्हा लोकांना संशय आला.
लोकांनी जवळ जात पाहिले असता प्रमोद यांचा श्वास थांबला होता. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. प्रमोद यादव यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह पोलिसांनी हॉस्पिटलला पाठवला. कारमध्ये चालकाचा मृत्यू झाल्याची बातमी परिसरात पसरतात, लोकांनी गर्दी केली. कार चालवताना प्रमोद यादव यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी कार बाजूला घेतली. त्यानंतर तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं बोललं जातं, परंतु अद्याप पोस्टमोर्टम रिपोर्टची पोलीस प्रतिक्षा करत आहेत.