नवी दिल्ली - वस्तू व सेवा कर (जीएसटी) संरचनेत केलेल्या व्यापक सुधारणा देशाला आधार आणि वृद्धी अशी दुहेरी ताकद देणाऱ्या असून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून त्या लागू होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. या बदलाचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार असून, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळेल. नवी जीएसटी व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि २१ व्या शतकात भारताच्या विकासाला बळ देणारी आहे, असेही ते म्हणाले.
जीएसटीचे टप्पे चार वरून दोन करण्याचा तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू ५ टक्क्यांच्या टप्प्यात समाविष्ट करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांसोबत संवाद साधताना सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून मी सांगितले होते की, भारताला स्वावलंबी बनविण्यासाठी पुढील पिढीच्या सुधारणा आवश्यक आहेत. मी देशवासीयांना आश्वासन दिले होते की, दिवाळी व छठ पूजेपूर्वी दुहेरी आनंद लाभेल. त्यानुसार या सुधारणा आणल्या गेल्या आहेत.
मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की, काँग्रेसच्या काळात घरगुती उपभोगाच्या आवश्यक वस्तूंवर भरमसाट कर होता. आमच्या सरकारने सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता काम सोपे झालेजीएसटी प्रणाली आता पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहे आणि नवीन कर दर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू होतील. जीएसटी २.० देशाला आधार आणि वृद्धी अशी दुहेरी शक्ती देईल. २१ व्या शतकात भारताच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पिढीच्या या सुधारणा आहेत. या कर सुधारणांमुळे भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेत पाच नवीन रत्न (पंच रत्न) जोडले गेले आहेत. वेळेवर बदल न केल्यास देशाला सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आपले योग्य स्थान मिळू शकत नाही, असेही मोदी यांनी म्हटले आहे.