जीएसटी बदलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल करणे हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय आहे, असे म्हटले आहे.
जीएसटी आता आणखीन सरळ, सुटसुटीत झाला आहे. दिवाळीपूर्वी भारतीयांना डबल धमाका अनुभवता येणार आहे. जीएसटीमध्ये आता ५ आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब उरले आहेत. यामुळे नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनाही जीएसटी सोपा झाला आहे. GST 2.0 ची ही व्यवस्था घरे, छोटे व्यापारी आणि उद्योगांना दिलासा देणारी आहे, असे मोदी म्हणाले.
मागच्या सरकारांद्वारे वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात होता. मी सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे सरकार होते, ते स्वयंपाक घरातील वस्तू, शेतमाल असेल की औषधे यावर वेगवेगळे कर आकारत होते. आज जर तो काळ असता तर तुम्हाला १० रुपयांच्या वस्तूवर २०-२५ टक्के कर भरावा लागला असता. आमच्या सरकारने सामान्यांच्या आयुष्यात जास्तीत जास्त बचत करण्यासाठी बदल केले आहेत, त्यांचे आयुष्य चांगले बनविले आहे, असे मोदी म्हणाले.
२२ सप्टेंबरपासून हे बदल लागू होतील. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल आहे. पूर्वी ज्या वस्तू उच्च कर स्लॅबमध्ये होत्या त्या आता बहुतेक ५% आणि १८% च्या स्लॅबमध्ये येतील. यामुळे हॉटेल, प्रवास, आवश्यक वस्तू या सर्वच आवाक्यात येणार आहेत. देशातील तरुणांना फिटनेस क्षेत्रातील बदलांचा फायदा होईल. जिम, सलून, योगा... या सेवांवरील कर कमी करण्यात आला आहे, याचा अर्थ आपले तरुण तंदुरुस्त राहतील, असे मोदी म्हणाले.