तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील कोंडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पोटच्या दोन मुलांची हत्या करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. संबंधित व्यक्ती राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. कौटुंबिक वादातून मृताची पत्नी गेल्या आठवड्यात बाहेर निघून गेली होती. तेव्हापासून तो नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
कोंडापूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सकाळी नऊ वाजता त्यांना एका खोलीतून कुजलेल्या मृतदेहाचा दुर्गंध येत असल्याचा फोन आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरात संबंधित व्यक्ती गळफास घेतलेल्या आणि त्याची दोन्ही मुले जमिनीवर मृतावस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. सुभाष (वय, ४२), ऋत्विक (वय १३) आणि आराध्या (वय ९) अशी मृतांची नावे आहेत.
संगारेड्डी पोलिसांनी कलम १०३(१) (हत्या) आणि बीएनएसएस (संशयास्पद मृत्यू) च्या १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनांचा नेमका क्रम आणि कृत्यामागील हेतू शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड एक सुसाइड नोट सापडली, ज्यात पत्नीला त्रासाला आणि वागणुकीला वैतागून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.