पाटणा : बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला असून, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी ७२ तासांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा अल्टिमेटम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी दिला. येत्या शुक्रवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, तत्पूर्वी तेजस्वींनी राजीनामा न दिल्यास नितीशकुमार त्यांना पदावरून बरखास्त करू शकतात, असे संकेत मिळत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे कोणत्याही स्थितीत आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नाहीत. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात लालू व त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते.त्यामुळे नितीशकुमार यांनी तेजस्वींना मंत्रिमंडळातून पायउतार होण्यास सांगितले आहे.प्राप्त स्थितीवर विचार करण्यासाठी लालूंनी पक्षाची बैठक बोलावली आहे. तेजस्वींनी सध्या राजीनामा देणेच योग्य राहील. त्यामुळे राजकीय विरोधकांची धारही कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे संकेत मिळत आहेत.२८ वर्षीय तेजस्वी यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मागील आठवड्यात नितीशकुमारांची भेटही घेतली होती; परंतु त्याने मुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही.विशेष म्हणजे लालूंच्या आमदारांची संख्या नितीशकुमारांच्या आमदारांच्या संख्येपेक्षा जास्त असूनही तेजस्वींनी राजीनामा दिल्यास सरकारला धोका नाही, असे नितीशकुमार सांगत आहेत.२४३ आमदारांच्या बिहार विधानसभेत सत्ताधारी आघाडीत राजदचे ८०, जदयूचे ७१, तर काँग्रेसचे २७ सदस्य आहेत. विरोधकांत भाजप ५३, लोजप २, आरएलएसपी २, एचएएम १, माकपा (एमएल) ३, अपक्ष ४ आहेत. राज्यातील आघाडीचे काही बरेवाईट झाल्यास बदलती स्थिती लक्षात घेऊन लालूप्रसाद यादव हे मायावतींशी हातमिळवणी करण्याचे संकेत आहेत. तसेच जदयू व भाजप एकत्र येण्याचीही चर्चा आहे. नोटाबंदी, राष्टÑपती निवडणुकीच्या निमित्ताने नितीशकुमार हे रालोआच्या जवळ गेल्याचे मानले जाते. यामुळे राज्यातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
७२ तासांत राजीनामा द्या, तेजस्वींना अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:03 IST