तासगाव निवडणुकीतून दोघांची माघार
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
सर्व अर्ज वैध : भाजपा बंडखोरासह १७ रिंगणात
तासगाव निवडणुकीतून दोघांची माघार
सर्व अर्ज वैध : भाजपा बंडखोरासह १७ रिंगणाततासगाव : बहुचर्चित बनलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले. मात्र किशोर दिनकर उनउने (सावळज) व नानासाहेब आनंदराव शिंदे (जरंडी) यांनी बुधवारी आपले अर्ज मागे घेतले.राष्ट्रवादी काँग्रेसने सुमनताई पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचदिवशी सर्वच पक्षांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढविण्याबाबत आग्रही असल्यामुळे भाजपाचा निर्णय उशिरा झाला. भाजपानेही सुमनताईंना पाठिंबा दिला. मात्र त्यानंतरही भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांचे समर्थक स्वप्निल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या स्वप्निल पाटील यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज शिल्लक असून अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.