ऑनलाइन लोकमतगुवाहाटी, दि. २५ - गणपती या देवाची प्लास्टिक सर्जरी झाली होती असे म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदींचे हे विधान विज्ञानात मिथक कथांची भर घालणारे आहे असे गोगोईंनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात प्राचीन काळापासून भारतात जेनेटीक सायन्स असल्याचे सांगत गणपतीचीही प्लास्टिक सर्जरी झाली होती असे विधान केले होते. मोदींच्या या उदाहरणावर आता टीका सुरु झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री अरुण गोगोई यांनी ट्विटरवरुन मोदींच्या या विधानाचा समाचार घेतला. गोगोई म्हणतात, एकीकडे मोदी मंगळ वारी यशस्वी करणा-या शास्त्रज्ञांते स्तुती करतात तर दुसरीकडे अंधश्रद्धा आणि मिथक कथांचे समर्थक करतात हे मोदींचे दोन मुखवटे आहेत. भाजपा धर्मनिरपेक्षता आणि एकतेच्या गप्पा मारते तर दुसरीकडे त्यांचेच नेते हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होतात अशी टीकाही त्यांनी केली. भाजपाची ही भूमिका २१ व्या शतकात भारताला कुठे नेणार असा प्रश्च त्यांनी उपस्थित केला आहे.
गणपतीच्या विधानावरून तरुण गोगाई यांचे मोदींवर टीकास्त्र
By admin | Updated: November 25, 2014 19:29 IST