नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी द्विपक्षीय चर्चेदरम्यान अगदी स्पष्ट शब्दांत काही जटील मुद्दे उपस्थित केले. पाकिस्तानने काश्मीर हाच ‘मुख्य मुद्दा’ असल्याचे जाहीर केले.भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ ऐजाज अहमद चौधरी यांच्यातील बैठकीत पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबतचा खटला यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. चौधरी हे नवी दिल्लीत आयोजित ‘हार्ट आॅफ आशिया’ संमेलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. पठाणकोट हल्ल्यानंतर उभय विदेश सचिवांची ही पहिली भेट आहे. या भेटीदरम्यान भारताने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने केली. तथापि जाधव यांचे अपहरण केले नसून त्यांना अटक झाल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बलुचिस्तान व कराचीमधील विध्वंसक कारवायांमध्ये भारताची रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग (रॉ) सामील असल्याचा आरोप करून पाकने त्यावर चिंता व्यक्त केली. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला.‘काश्मीर हाच चर्चेचा मुख्य मुद्दा आहे आणि त्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मिरी जनतेच्या भावनानुरूप उचित तोडगा काढण्याची गरज आहे,’ असे आपल्या विदेश सचिवाने स्पष्ट केल्याची माहिती पाकिस्तानने दिली. याबाबत भारताच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया अथवा औपचारिक वक्तव्य देण्यात आले नाही.विदेश सचिव स्तरावरील या द्विपक्षीय चर्चेत पठाणकोट हल्ला आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीपूर्वी सांगितले. पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या जानेवारीत द्विपक्षीय चर्चा बंद करण्यात आली होती.‘विदेश सचिव अहमद यांनी आपल्या सर्व शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे. जम्मू-काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली,’ असे पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
दहशतवादाबाबत दिसेल अशी ठोस कारवाई करा
By admin | Updated: April 27, 2016 04:53 IST