नवी दिल्ली : ‘मुघलकालीन ताजमहाल’ हे तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे एएसआय संरक्षित स्मारक ठरले आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत ‘ताजमहाल’ने २९७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला.केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
मागील पाच वर्षांत प्रवेश तिकिटांच्या विक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळालेली स्मारके कोणती, असे विचारण्यात आले होते. याच्या उत्तरात मंत्र्यांनी माहिती दिली. पाचही वर्षांत ‘ताजमहाल’ने अव्वल स्थान मिळवले.
ताजमहाल १७व्या शतकात सम्राट शाहजहानने बांधला होता. २०१९-२०मध्ये आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुबमिनार अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर होते. आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये तामिळनाडूतील ममल्लापूरम आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते.