नवी दिल्ली - मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) १८ दिवसांच्या कोठडीच्या कालावधीत सखोल चौकशी करणार आहे. त्याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय तसेच कोणकोणते दहशतवादी गट सामील होते याची माहिती त्याच्याकडून मिळविली जाणार आहे.
राणाशी आमचा कोणताही संबंध नाही, असे सांगून पाकिस्तानने हात झटकले आहेत. मात्र त्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडण्यासाठी राणाचा जबाब अतिशय महत्त्वाचा आहे. तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून गुरुवारी (दि. १०) संध्याकाळी भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला एनआयएने अटक केली. त्यानंतर दिल्लीतील पतियाळा हाउस येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात राणाला हजर केल्यानंतर न्यायमूर्ती चंदरजीत सिंग यांनी त्याला १८ दिवसांची कोठडी दिली. एनआयएने त्याला २० दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती केली होती.
६४ वर्षीय राणा हा पाकिस्तानचा मूळ रहिवासी असून, त्याने नंतर कॅनडाचे नागरिकत्व पत्करले. तो मुंबई हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीचा (ऊर्फ दाऊद गिलानी) निकटवर्तीय आहे. राणाने प्रत्यार्पणाविरोधात केलेला अर्ज अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल रोजी फेटाळला होता.
मुंबईत हेडली, राणामध्ये २३०हून अधिक कॉल२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली मुंबईत आला असताना तो राणाशी नियमित संपर्कात होता. दोघांनी परस्परांना २३०हून अधिक कॉल केले होते. राणा ‘मेजर इक्बाल’ नावाच्या आणखी एका आरोपीशीही संपर्कात होता. राणा स्वतःही नोव्हेंबर २००८ मध्ये, हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. चार्जशीटनुसार, तो पवईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता.
राणाला तपासासाठी कुठे न्यायचे हे एनआयए ठरविणारमुंबई : राणा याला तपासासाठी कुठे न्यायचे याचा निर्णय राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि केंद्रीय गृह मंत्रालय घेतील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.राणाला मुंबईत आणले जाईल का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की मुंबई पोलिस एनआयएला तपासाबाबत पूर्ण सहकार्य करतील. तपासासाठी राणाला कुठे न्यायचे याचा निर्णय एनआयए घेणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले, त्या मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले.
राणाला कडक बंदोबस्तात ठेवले एनआयए मुख्यालयात तहव्वूर राणाला एनआयए मुख्यालयात १८ दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आलेे आहे. त्यामुळे या मुख्यालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स पथकही तिथे तैनात करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील दोघांचा हल्ल्याच्या कटात होता सहभागदिल्लीत एनआयएने न्यायालयाला सांगितले की, २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमागील व्यापक कटाचा शोध घेण्यासाठी राणाची चौकशी अत्यावश्यक आहे. डेव्हिड कोलमन हेडली याने भारतात येण्यापूर्वी राणाला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती कळविली होती. तसेच आपली मालमत्ता व अन्य बाबींसंदर्भातही ई-मेल पाठविला होता. या कटात पाकिस्तानमधील इलियास काश्मिरी, अब्दुर रहमान यांचाही सहभाग असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.