'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. मात्र, पाकिस्तानाच्या कुरापती अद्याप थांबलेल्या नाहीत. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक संशयास्पद स्फोट झाला. या घटनेत एक संशयास्पद ड्रोन हाय-टेंशन पॉवर लाईनला धडकला, ज्यामुळे हा स्फोट झाला. सदर घटना गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान खावडा इंडिया ब्रिज सीमा परिसरात घडली आहे.
पोलीस आणि हवाई दल सध्या या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, सुरक्षा एजन्सी देखील सध्या सतर्क झाल्या आहेत. मात्र, हा ड्रोन सीमेपलीकडून आला होता का, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला!जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटक मारले गेले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तान देखील बिथरला आहे.
दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता कच्छमध्ये झालेल्या या संशयास्पद ड्रोन स्फोटाचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. खबरदरीचा उपाय म्हणून या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सेना देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.