नवी दिल्ली : एकीकडे प्रजासत्ताक दिनावर १०० कोटी रुपये खर्च करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याचा विषय आला की अपिले करीत राहायची, या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कडक शब्दांत टीका केली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी तुम्ही १०० कोटी खर्च करता, पण शोतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला वा नुकसानभरपाई देण्याची वेळ आली की तुम्ही न्यायालयात अपील दाखल करता, असे उद्गार सरन्यायाधीश एच़ एल़ दत्तू यांनी सरकारवर खरमरीत टीका करताना काढले. शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी मोबदला देण्यासंदर्भात पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. पंजबामध्ये छावणी परिसरात संपादन केलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालली होती. न्या. ए़ के़ सिक्री व न्या. अरुण मिश्रा हे खंडपीठावरील अन्य न्यायाधीश होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भपकेबाज सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
By admin | Updated: February 12, 2015 05:11 IST