नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या अंदाज समितीने त्यांच्या ताज्या अहवालात मंत्रालयाच्या अधिकाºयांनी यासंदर्भात दिलेली माहिती नमूद केली आहे. जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाºयांनी समितीस सांगितले.आत्महत्या आणि सेवा बजावताना आलेला मृत्यू यांचे सर्वाधिक व्यस्त गुणोत्तर सशस्त्र सेवा दल (१:८), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (१:६३) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (१: ४) या निमलष्करी दलांमध्ये आहे, असेही समितीस सांगण्यात आले.समितीच्या अहवालानुसार गृह सचिवांनी असे सांगितले की, या विषयी आम्ही मंत्रालयात चर्चा केली. त्यातून असे दिसले की, जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. या दलांमधील जवान वर्षातील १०-११ महिने घराबाहेर असतात. त्यावरून वैवाहिक संबंधांना संशयाचे ग्रहण लागते व त्यातून साहजिकच मानसिक तणाव निर्माण होतो. या दलांना नेहमीच कुठे ना कुठे तैनात करावे लागत असल्याने कर्मचाºयांना त्यांच्या हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.मंत्रालायाने असेही सांगितले की, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व भारत तिबेट सीमा पोलीस या दलांनी त्यांच्या नावाप्रमाणे ठराविक ठिकाणीच काम करणे अपेक्षित असले तरी निर्माण होणाºया परिस्थितीनुसार त्यांना आसाम ते केरळ आणि केरळ ते काश्मिर असे देशात कुठेही तैनात केले जाते. परिणामी या दलांमधील जवानांचा एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम नसतो. त्यांचे मुख्यालयही एका ठिकाणी नसते.अशा झाल्या आत्महत्यागृह मंत्रालयाने या सहा वर्षाच्या काळात प्रत्येक दलामध्ये किती आत्महत्या झाल्या याची संगतवार माहिती मंत्रालयाने समितीस दिली नाही. मात्र काही दलांची काही वर्षांची आकडेवारी दिली.ती अशी-- सीआरपीएफ: (सन २०१२) १८९ आत्महत्या, १७५ सेवेत मृत्यू- बीएसएफ: (सन २०११) ५२९ आत्महत्या, ४९१ सेवेत मृत्यू- आयटीबीपी: (सन २००६) ६२ आत्महत्या, १६ सेवेत मृत्यू- सीआयएसएफ: (सन २०१३) ६३ आत्महत्या, एक सेवेत मृत्यू- एसएसबी: (सन २०१३) ३२ आत्महत्या, चार सेवेत मृत्यू- आसाम रायफल्स : (सन २०१४) २७ आत्महत्या, ३३ सेवेत मृत्यू
निमलष्करी दलांमध्ये आत्महत्या अधिक; अस्थैर्य, एकाकीपणाने जवानांमध्ये नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:15 IST