श्रीहरिकोटा : आजपर्यंतच्या सर्वांत महाग व सर्वांत शक्तिशाली अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट निसारचे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेबरोबरच भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या मोहिमेवर १२,५०० कोटी रुपये खर्च झाले असून, प्रक्षेपणानंतर १९ मिनिटांनी उपग्रह कक्षेत स्थापित करण्यात आला.
इस्रो आणि नासाने तयार केलेल्या या उपग्रहाला बुधवारी दुपारी ५:४० वाजता जीएसएलव्ही-एफ१६ रॉकेटमार्फत अवकाशात पाठवण्यात आले. निसारला ७४७ किलोमीटर उंचीवरील सन-सिन्क्रोनस कक्षेमध्ये स्थापित करण्यात आले. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
मोहिमेचा उद्देश कोणता?
जमीन व बर्फाचे बदल : हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा ग्लेशियर्समध्ये होणारे बदल टिपणार आहे. भूस्खलन किंवा बर्फ वितळण्याची नोंद घेणार आहे.
नैसर्गिक स्थितीवर बारीक लक्ष : जंगल, शेत व इतर नैसर्गिक ठिकाणांच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी छोटे बदलही टिपण्याची त्याची क्षमता आहे.
समुद्री क्षेत्र : उपग्रह समुद्राच्या लाटा, त्यातील बदल व समुद्री पर्यावरणाचे बदल टिपणार आहे.
कसा आहे उपग्रह?
याचे संपूर्ण नाव नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार (निसार) आहे. हा उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार आहे. ढग, घनदाट जंगल, धुके, एवढेच नव्हे, तर अंधारातही पाहण्याची याची क्षमता आहे.