पाटणा : दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार आणि २९ जखमी झाले होते.बिहार सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. गृहसचिव आमिर सुभानी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे चौकशी समितीचे सदस्य आहेत. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या कुणालाही सरकार सोडणार नाही, असे जलस्रोत मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. चौकशी समिती येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वेच्छेने बयाण देण्यास तयार असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेईल. त्याशिवाय घटनेबाबतची अधिक माहिती देण्याचे आवाहन करणारी एक जाहिरातही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. दसरा उत्सवादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मैदानावर प्रकाश योजना अपुरी होती, याकडे लक्ष वेधले असता चौधरी म्हणाले, राज्य सरकारला त्याची माहिती आहे. परंतु चौकशी अहवाल मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल.जखमी असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या वेळी मैदानावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व दंडाधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. चौकशी एक आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
चेंगराचेंगरीवरून बिहार-केंद्रात जुंपली
By admin | Updated: October 6, 2014 02:42 IST