नाशिक : नाशिकहून पुणे आणि मुंबई येथे जाणार्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता श्रीनिवास एअरलाइन्स या कंपनीने नाशिक, पुणे आणि मुंबई या विमानसेवेला सुरुवात केली. स्वामी समर्थ सेवामार्गाचे अण्णासाहेब मोरे, बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनी, खासदार हेमंत गोडसे, एचएएलचे मुख्याधिकारी दलजित सिंग, भाजपा नेते सुनील बागुल आदिंच्या हस्ते पूजा करून विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना घेऊन वैमानिक अमित कुमार आणि सहवैमानिक जयकांत यांनी ओझर विमानतळ परिसरात हवाई सफर केली. सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानातून सोमवार ते शनिवार दैनंदिन स्तरावर वाहतूक केली जाणार असून, भविष्यात सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या संचालकांनी सांगितले. मुंबई ते नाशिक अशी दररोज सकाळी ८ वाजता, नाशिक ते मुंबई दरम्यान दुपारी ४.३०, नाशिक ते पुणे सकाळी १० आणि पुणे ते नाशिक ३.३० या वेळेत ही सेवा दिली जाणार असून, याशिवाय मुंबई ते शिर्डी विशेष सेवा सुरू करण्यात येणार आहे. सोमवारपासून या सेवेला प्रारंभ होणार असून, सुरुवातीच्या सर्व फेर्या आरक्षित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी श्रीनिवास एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक गणेश टिबे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीनिवास एअरलाइन्सच्य विमानसेवेचे उद्घाटन
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST