नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र अवघ्या ६ महिन्यात इंडिया आघाडीत फूट दिसू लागली आहे. दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राजकीय वर्तुळात काँग्रेस आणि सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु आपचे संयोजक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, आम आदमी पार्टी दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढणार आहे. काँग्रेससोबत कुठल्याही आघाडीची शक्यता नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. ANI या वृत्तसंस्थेने काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. १५ जागा काँग्रेस आणि १-२ जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांना दिल्या जातील. उर्वरीत जागांवर आम आदमी पक्ष त्यांचे उमेदवार उभे करेल अशी सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून या चर्चा फेटाळल्या आहेत.
आपकडून २ उमेदवार यादी जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २० उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. आपने यावेळी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा मतदारसंघ बदलला आहे. सिसोदिया हे पटपडगंज ऐवजी जंगपुरा मतदार संघातून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर नुकतेच आपमध्ये प्रवेश घेतलेले अवध ओझा यांना पटपडगंज येथून पक्षाने उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, AAP ने नरेलातून दिनेश भारद्वाज, तिमारपूर येथून सुरेंद्र पाल सिंह बिट्टू, आदर्श नगर मतदारसंघातून मुकेश गोयल, मुंडकातून जसबीर कारला, मंगोलपुरीतून राकेश जाटव धर्मरक्षक, रोहिणीतून प्रदीप मित्तल, चांदनी चौकातून पुनरदीप सिंग साहनी, पटेल नगरमधून प्रवेश रतन, मादीपुरतून राखी बिर्ला, जनकपुरीतून प्रवीण कुमार, बिजवासनमधून सुरेंद्र भारद्वाज, पालम मतदारसंघातून जोगिंदर सोलंकी, जंगपुरातून मनिष सिसोदिया यांची उमेदवारी जाहीर केली आहे.