नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस खासदारांनी हौद्यात येऊन घोषणाही दिल्या. त्यानंतर सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. काँग्रेस खासदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरिराज सिंह यांना अखेर सोनिया गांधी यांची माफी मागावी लागली. लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी गिरिराज यांच्या सोनिया गांधींविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. भाजपाचे खासदार आणि मंत्री सतत अशाप्रकारची आक्षेपार्ह आणि बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात दुफळी निर्माण होत असून सामंजस्यही बिघडत चालले आहे, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.खरगे बोलत असताना अचानक त्यांचा माईक बंद पडला. त्याचा निषेध नोंदविताना खरगे म्हणाले, ’मी जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हाच माईक बंद पडतो. मी या गोष्टीचा निषेध करीत आहे.’
गिरिराज सिंहांनी अखेर मागितली सोनियांची माफी
By admin | Updated: April 21, 2015 02:33 IST