शामली चकमकीत शहीद झालेले यूपी एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी सुनील कुमार यांचा मुलगा श्रद्धांजली देताना ढसाढसा रडला. "बाबा, एकदा डोळे उघडा..." असं म्हणत तो रडत होता. त्याची अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यांत देखील पाणी आलं. यावेळी एडीजी, डीआयजी, एसएसपी यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते.
सुनील कुमार हे मेरठच्या इंचौली पोलीस स्टेशन परिसरातील मन्सूरी गावचे रहिवासी होते. गुरुवारी सकाळी त्यांचं पार्थिव मेरठ पोलीस लाईन येथे आणण्यात आलं, जिथे एडीजी डीके ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सुनील कुमार यांचे पार्थिव पोलीस लाईनच्या शहीद स्मारकात आणण्यात आलं.
सुनील यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलीस लाईन गाठली. यावेळी श्रद्धांजली वाहताना मुलगा मनजीत याची वाईट अवस्था झाली होती. मनजीत रडत रडत म्हणाला- "बाबा, एकदा डोळे उघडा... प्लीझ आज माझ्याशी बोला" हे दृश्य पाहून सर्वजण भावुक झाले. एडीजी, डीआयजी, एसएसपी यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
बुधवारी यूपी एसटीएफचे निरीक्षक सुनील कुमार शहीद झाल्याची माहिती आहे. चकमकीत त्यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. १९७१ रोजी जन्मलेले सुनील कुमार मूळचे मेरठचे होते. १९९० मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. सुनील कुमार यांना बढती देण्यात आली होती.