नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे आमदार आणि राज्याचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. यानंतर आयोगाने सोमनाथ यांना नोटीस जारी करून २६ जूनपर्यंत त्याचे उत्तर देण्याचे बजावले आहे. खुद्द भारती यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.२०१० मध्ये सोमनाथ भारती यांचा विवाह लिपिका मित्रा यांच्यासोबत झाला होता. लिपिका यांनी आयोगासमक्ष दाखल केलेल्या तक्रारीत सोमनाथ यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. मी आणि माझी मुले पती सोमनाथ भारती यांच्याकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाने पीडित आहोत. पती आणि त्यांच्या समर्थकांकडून माझ्या आणि माझ्या मुलांच्या जीवितास धोका आहे, असे लिपिका यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लिपिका यांच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाने सोमनाथ यांना नोटीस जारी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोमनाथ भारतींवर पत्नीच्या छळाचा आरोप
By admin | Updated: June 10, 2015 23:54 IST