ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - काँग्रसने विकासात अडथळा आणण्यासाठी राज्यसभेत गोंधळ माजवत अनेक विधेयके पारित होऊ दिली नाहीत, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींनी केली आहे. GST विधेयकास विरोध करुन काँग्रेसने भाजपाला विरोध न करता विकासास विरोध केला, असेही त्या म्हणाल्या.
पंडित नेहरुंवर हल्लाबोल करत मोदी सरकार नवीन इतिहास लिहीण्याचा प्रयत्न करत असल्याची आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. सरकारवर संघाचे नियंत्रण असल्याचा पुरावाच देशासमोर आल्याचेही त्या म्हणाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
ज्यांनी विकास करण्याच्या नावाखाली देशाची तिजोरी खाली ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. आपली दुबळी नीती व अपयशी संघटन नेतृत्व लपवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी आज पंतप्रधान मोदींचा आसरा घेतल्याचा आरोप त्यांंनी केला. मात्र काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केल्यास आम्हाला काहीच हरकत नाही, कारण जेव्हा मोदीजींवर बोट उठवले जाते, तेव्हा देशातील संपूर्ण जनता त्यांच्या पाठिशी उभी राहून विकासाच्या मार्गावर पुढे जाते असा पलटवार त्यांनी केला.
अमेठीत काँग्रेसने शेतक-यांची जमीन लुटल्याचा आरोप करत अमेठीकरांचा विकास तर दूरचीच गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.