स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले.
स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान
सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले. सोलापूर महानगरपालिका व प्लास्ट इंडिया फाउंडेशन, मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत महापौर प्रा. सुशीला आबुटे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेविका गीता मामड्याल, नगरसेवक चेतन नरोटे, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी प्लास्टिक वापर, पुनर्वापर नियंत्रण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बोलताना महापौर प्रा. सुशीला आबुटे म्हणाल्या की, टापटिपपणा, नीटनेटकेपणा व सुटसुटीतपणा, स्वच्छता आरोग्य म्हणजेच स्मार्ट सिटी होय. जे आहे ते चांगले ठेवले पाहिजे, असे आबुटे म्हणाल्या. यावेळी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील म्हणाले की, स्मार्ट सिटी व स्वच्छ सोलापूरकरिता चार गटांद्वारे अभियान राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील फेरीवाले गट, व्यापार्यांचा गट, नागरिकांचा गट, अन्य गट यांना आवाहन करण्यात आले आहे. फेरीवाल्यांनी आपला कचरा रस्त्यावर न टाकता आपल्याजवळ साठवून तो कचराकुंडीत टाकावा. व्यापार्यांनी आपले दुकान झाडल्यानंतर तो कचरा फुटपाथवर अथवा रस्त्यावर लोटून देऊ नये, डसबीनमध्ये ठेवावा, घंटागाडी आल्यानंतर घेऊन जाईल. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक अतिशय धोकादायक असून, वापरू नये. केंद्राच्या 10 स्मार्ट सिटी यादीत सोलापूरचा निश्चित समावेश असेल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका निर्मला जाधव, विजया वड्डेपल्ली, कुमुद अंकाराम, बाबा मिस्त्री, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगरसचिव ए.ए. पठाण, जितेंद्र जोशी, काशिनाथ भतगुणकी, राजू राठी, केतनभाई शहा, गीता पाटोळे, एन.जी.ओ. संस्था, प्रशालेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, व्यापारी मंडळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)चौकट..पर्यावरणात पंचमहाभूतांची संकल्पना : अंधारेपंचमहाभूतांची संकल्पना पर्यावरणात आहे. प्रदूषण दूर झाल्यावरच व स्वच्छ भारत झाल्यावरच हेल्दी इंडिया होईल. सध्या अपटेकवर जग उड्या मारत आहे. प्लास्टिक हे पेट्रोकेमिकलपासून बनते. ओला व सुका कचरा वेगळा करा त्यामुळे प्लास्टिकवर नियंत्रण मिळवता येईल. पूर्वी एक व्यक्ती एका वर्षात 800 ग्रॅम प्लास्टिक सरासरी वापरत होता तर 2013 च्या आकडेवारीनुसार एक व्यक्ती एका वर्षात 13 किलो प्लास्टिक वापरत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, असे आवाहन यावेळी प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे यांनी केले.