नाशिक : १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार्या पदवीधर मतदारांच्या नोंदणीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामागे नोंदणीसाठी अल्प कालावधी, मतदारांचा अनुत्साह व एकगठ्ठा अर्ज घेण्यास शासकीय यंत्रणेचा असलेला विरोध ही कारणे सांगितली जात आहेत, तथापि या नोंदणीसाठी यंत्रणेने संपूर्ण तयारी केल्याचा दावाही केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पदवीधर मतदारसंघाची जुनी म्हणजेच २००९ च्या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदार यादी न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नव्याने यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना अल्प कालावधीत नवीन मतदारांनी नोंदणी करण्याची जबाबदारी यंत्रणेवर येऊन पडली आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे यासाठी मतदार नोंदणीचे अर्ज ठेवले जाणार आहेत, शिवाय सध्या सुरू असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या पुनर्रीक्षण मोहिमेतही राबविण्यात येणार्या उपक्रमांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीबाबत आवाहन करण्यात येणार आहे. असे असले तरी, सध्याचे सणासुदीचे दिवस पाहता पदवीधर मतदार स्वत:हून मतदार नोंदणीसाठी येतील याविषयी शासकीय यंत्रणेलाच खात्री नाही. जुलै महिन्यात पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी छायांकित करण्याचा कार्यक्रम यंत्रणेने हाती घेतल्यावर जवळपास ६० टक्के मतदारांचे पत्तेच सापडले नाहीत, शिवाय प्रशासनाने छायाचित्रे आणून देण्याच्या केलेल्या आवाहनाकडे पदवीधरांनी पाठ फिरविली होती. हा अनुभव पाहता पदवीधर स्वत:हून मतदार म्हणून नोंदणी करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र पदवीधर मतदार संघात होऊ घातलेली निवडणूक पाहता, राजकीय पक्ष व उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर हक्काच्या मतदारांची नोंदणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु त्यालाही यंत्रणेचा आक्षेप असून, एकगठ्ठा मतदारांचे अर्ज न स्वीकारण्याची भूमिका घेत, ज्या व्यक्तीला मतदार म्हणून नोंद करायची आहे, त्यानेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे किंवा कुटुंब प्रमुख असा अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे एरव्ही राजकीय पक्षाकडून एकगठ्ठा मतदार नोंदणीसाठी केले जाणारे प्रयत्नही फोल ठरण्याची शक्यता आहे.
पदवीधर मतदार घटण्याची शक्यता अल्पकालावधी : मतदारांचा अनुत्साह
By admin | Updated: September 23, 2016 00:51 IST