हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात हाहाकार माजला आहे. मंडी जिल्ह्यात जोरदार पावसाने परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. निहरी तहसीलच्या ब्रगटा गावात रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात दोन महिला आणि आठ महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला.
उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सुंदरनगर अमर नेगी यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनातर्फे पीडित कुटुंबांना तातडीने मदतसामग्री आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आणि संवेदनशील भागांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. भूस्खलनाची घटना घडली, तेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते, असे सांगण्यात येत आहे.
धर्मपूरमध्ये बसस्थानक पाण्याखालीधर्मपूरमध्ये काही क्षणातच पाण्याचा प्रचंड लोंढा बाजारपेठ आणि बसस्थानकात शिरला. धर्मपूर बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तेथे उभ्या असलेल्या अनेक बस गाड्या पाण्यात वाहून गेल्या. बाजारातील अनेक दुकाने आणि स्टॉल्सही पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले असून, त्यांचे सर्व सामान खराब झाले आहे.
मंडीमध्ये अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. तातडीने मदत आणि बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे, परंतु खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. अजूनही सहा लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पोलीस आणि एसडीआरएफ पथके त्यांचा शोध घेत आहेत.
धर्मपूर व्यतिरिक्त मंडीच्या इतर भागांमध्येही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे. छोटे पूल वाहून गेले आहेत आणि रस्ते ढिगाऱ्याने भरले आहेत. मंडी-कुल्लू महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रवाशांना तासन्तास रस्त्यात अडकून पडावे लागले.
पुरामुळे जनजीवन विस्कळीतलोकांचे म्हणणे आहे की यावर्षीच्या पावसाने अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ज्या कुटुंबांची दुकाने आणि घरे पाण्यात बुडाली आहेत, त्यांना आता उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ परिस्थितीची गंभीरता दर्शवत आहेत. धर्मपूर बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त दिसत आहे. सर्वत्र तुटलेल्या दुकानांचे ढिगारे, वाहून गेलेली वाहने आणि चिखलच दिसत आहे.
हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे डोंगराळ भागात अशा नैसर्गिक आपत्त्यांची संख्या वाढली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत होणारा मुसळधार पाऊस डोंगराळ भागासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले असून, सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मात्र, ही भयावह दृश्ये पाहता डोंगराळ भागात पावसाचा प्रकोप अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट होते.