इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढल्यापासून फेसबूक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमांवर रील्स शेअर करण्याचं वेडही प्रचंड वाढलं आहे. तसेच असे रील्स शेअर करणाऱ्या मंडळी आपलं रील व्हायरल व्हावं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी वेगवेगळ्या उचापती करत असतात. दरम्यान, एका महिलेने रील बनवण्यासाठी चक्क रेल्वे रुळांवरून कार चालवल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हा व्हिडीओ तेलंगाणामधील शंकरपल्ली परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेलंगाणामधील शंकरपल्ली परिसरामध्ये एका महिलेने थेट रेल्वेच्या रुळांवर कार चढवत सुसाट पळवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वेच्या रुळांवरून कार पळवताना दिसत आहे. दरम्यान, या महिलेला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता ती ही कार तशीच सुसाट पळवून नेत फरार झाली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती. तसेच तिने रील बनवण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या महिलेने थेट रेल्वे रुळांवर कार पळवल्याने बंगळुरू हैदराबाद मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांना खबरदारीचा उपाय म्हणून थांबवावं लागलं होतं. अखेरीस आता या महिलेला जीआरपीने ताब्यात घेललं असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.