इंदूर : आंब्यांची राणी म्हटल्या जाणाऱ्या 'नूरजहां' प्रजातीच्या एका आंब्याचे वजन जवळपास 2.75 किलो झाले आहे. एवढ्या भल्यामोठ्या आंब्यासाठी लोक एका फळाला 1200 रुपये मोजत आहेत. मुळचा अफगाणिस्तानचा असलेल्या या आंब्याची प्रजातीचे नावच नूरजहां आहे. या प्रजातीची काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी झाडे मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कठ्ठीवाडामध्ये आहेत.
मध्य प्रदेशमधील हा भाग गुजरातच्या सीमेवर आहे. इंदूरहून जवळपास 250 किमी लांबीवर कट्ठीवाड़ा हे गाव आहे. या आंब्याची शेती करणारे तज्ज्ञ इशाक मंसूरी यांनी सांगितले की, यावेळी हवामान चांगले राहिल्याने 'नूरजहां' च्या झाडांना चांगली फळे लगडली. यामुळे या आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो राहिले आहे. तर गेल्या तीन वर्षांत हेच वजन 2.5 किलो एवढे होते.
नूरजहा या प्रजातीच्या आंब्यांची संख्या कमी असल्याने गुजरातच्या अहमदाबाद, वापी, नवसारी आणि बडोद्यापासून आंबा प्रेमींनी आगाऊ आरक्षण नोंदविले होते. यंदा उत्पन्न चांगले आल्याने गावातील लोकही आनंदीत आहेत.