नामदेव पाषाणकर, घोडबंदरजागावाटपाच्या मुद्यावरून आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून सेना-भाजपा महायुतीमध्ये तणाताणी सुरू असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी प्रचाराची रणनीतीही अलगपणे सुरू केल्याचे चित्र आहे. शिवसेनेचा नामोल्लेख टाळणारी पोस्टरबाजी भाजपाने मुंबईत सुरू केल्याचे पाहून सेनेनेही प्रचार वाहनांवरून भाजपाला कात्रजचा घाट दाखवला आहे.‘चला उठा, महाराष्ट्र घडवू या’ असे घोषवाक्य असणारी वाहने सजवून ती वाहने ठाण्यात दाखल झाली आहेत. छोट्या टेम्पोवर जाहिरातबाजी करून तुम्हाला तुमचा महाराष्ट्र कसा पाहिजे, ते आम्हाला मिस्ड कॉल देऊन कळविण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. या जाहिरातीमध्ये भाजपाच्या नेत्यांना स्थान दिलेले नाही. गेली २५ वर्षे युतीच्या कार्यकाळात यापूर्वी लढविलेल्या सर्व निवडणुकीत सेना-भाजपा युतीचे रथ तसेच दोन्ही पक्षांच्या चिन्हांचा समावेश असलेली वाहने प्रचारात फिरताना राज्याने बघितली आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र दिसत नाही.भाजपाने शिवसेनेला आपल्या पोस्टरवरून हटवल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या प्रचार वाहनांच्या जाहिरातीतून भाजपांला गायब केले आहे. छोट्या टेम्पोच्या (याला वाहन व्यावसायिक छोटा हत्ती असे म्हणतात.) माध्यमातून जाहिरात करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाहने ठाण्यात आली आहेत.
शिवसेनेच्या प्रचार रथातून ठाण्यात भाजपा गायब
By admin | Updated: September 25, 2014 01:23 IST