चेन्नई - अभिनेता विजय यांनी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केले. मदुरै येथे झालेल्या तमिलगा वेंट्री कझगमच्या दुसऱ्या राज्यस्तरीय बैठकीत विजय यांनी भाजपा आणि डिएमकेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. सोबतच त्यांचा पक्ष युतीत गुलामी करणार नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार असं घोषित केले आहे.
अभिनेता विजय यांनी भाजपाला फॅसिस्ट आणि डिएमकेला विषारी संबोधले. ते म्हणाले की, भाजपा आपला एकमेव वैचारिक शत्रू आहे तर डिएमके राजकीय शत्रू आहे. तामिळनाडूच्या गरजांना कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच नीट रद्द करणे, श्रीलंकेत पकडलेल्या मच्छिमारांना सोडवणे यासारख्या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. भाजपा अल्पसंख्याक समुदायासोबत भेदभाव करत असल्याचंही विजय यांनी म्हटलं.
अभिनेता विजय यांनी भाषणात पहिल्यांदा एआयडिएमकेवरही टीका केली. एमजीआर यांनी सुरू केलेला पक्ष आता कोण चालवतंय, आता पक्ष कसा बदललाय यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा राज्यात एखादी धाड पडते तेव्हा एआयडिएमकेचे नेते दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात आणि त्यानंतर तो मुद्दा अचानक शांत होतो असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनाही विजय यांनी टार्गेट केले. महिलांना १ हजार दिले जातात, पण त्या महिलांचा आवाज ऐकण्यासाठी १ हजार पुरेसे आहेत का? ज्या रडतायेत. स्टॅलिन यांनी महिलांना त्याशिवाय परंधुर एअरपोर्टसाठी शेतकरी आणि मच्छिमारांचीही फसवणूक केली असंही विजय यांनी सांगितले.
दरम्यान, माझा पक्ष तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढेल. जंगलात केवळ एकच शेर असतो आणि शेर हमेशा शेर राहतो असा इशाराही अभिनेता विजय यांनी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांना दिला. १९६७ आणि १९७७ च्या निवडणुकीचा उल्लेख करत २०२६ मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास विजय यांनी व्यक्त केला. मी राजकारणात स्वत:चा बाजार उघडण्यासाठी आलो नाही तर लोकांची सेवा करायला आलोय असं विजय यांनी लोकांना सांगितले.