UPSC Civil Services Result 2024:केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबेने युपीएससी परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या स्थानी हर्षिता गोयल आणि तिसऱ्या स्थानी पुण्याच्या अर्चित डोंगरे याचा क्रमांक लागला आहे. युपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवण्यानंतर देशभरातून शक्ती दुबेचे कौतुक केले होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या यशासाठी शक्तीने बरीच मेहनत घेतली होती. त्यातूनच तिला हे इतकं मोठं यश मिळालं.
शक्ती दुबे ही मूळची उत्तर प्रदेशातील प्रयागराजची आहे. तिचे वडील पोलिस दलात काम करतात आणि तिची आई गृहिणी आहे. सामान्या भारतीय कुटुंबात शक्ती मोठी झाली पण तिचा दृष्टिकोन अगदी सामान्य नव्हता. शाळेनंतर, ती वाराणसीला कॉलेजसाठी गेली आणि बनारस हिंदू विद्यापीठात दाखल झाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने बनारस विद्यापीठाची निवड केली आणि तिथेच बायोकेमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतले. तिथल्या वसतिगृहात राहिल्यानंतर कॅम्पसमधल्या विविध वादविवाद स्पर्धा आणि चर्चा सत्रांमध्ये ती भाग घेऊ लागली. त्यातूनच ती विद्यार्थी वादविवाद समितीची प्रमुख बनली. त्या अनुभवामुळे तिला धोरण, कायद्यामध्ये आवड निर्माण झाली.
अलाहाबाद विद्यापीठातून बी.एससी मध्ये ती सुवर्णपदक विजेती होती. त्यानंतर शक्तीने २०१८ मध्ये एम.एस्सी. केले. बीएचयूमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये बी.एस. यामध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. एम.एस्सी. केल्यानंतर, ती प्रयागराजला आली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागली. युपीएससीच्या तयारीसाठी ती अधूनमधून दिल्लीलाही जात असे. २०२० मध्ये कोरोना काळात ती प्रयागराजला आली होती. २०२३ च्या परीक्षेत दोन गुण कमी असल्याने तिची निवड होऊ शकली नाही. यामुळे तिला थोडी निराशा आली होती मात्र तिने हिंमत सोडली नाही आणि तयारी सुरू ठेवली. कठोर परिश्रमानंतर तिने इतिहास रचला.
"बीएचयूमधील वसतिगृहात राहताना मला जाणवले होते की पोलिस किंवा त्यांच्या वाहनामुळे माणसाला सुरक्षित वाटते. थोड्याशा शक्तीमुळे एखाद्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि नागरी सेवा मोठ्या प्रमाणात लोकांना कशा प्रकारे फायदेशीर ठरत आहेत हे लक्षात आल्यानंतर मी हे करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे मी या सेवेकडे आकर्षित झाले," असे शक्तीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
"माझ्या यूपीएससीच्या प्रवासाची सर्वात मोठी प्रेरणा पुस्तके किंवा कोचिंग क्लासेसमधून नव्हती, तर कॅम्पसमध्ये रात्री उशिरा चालत जाताना मिळाली होती. रात्री उशिरा क्लास झाल्यानंतर कॅम्पसमधल्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनमुळे मला सुरक्षित वाटायचे. या सुरक्षिततेच्या भावनेने माझ्यावर खोलवर छाप सोडली. त्या भावनिक गोष्टीने मला नागरी सेवांकडे आकर्षित केले," असे शक्ती दुबेने म्हटलं.
दरम्यान, शक्तीने युपीएससीसाठी विज्ञान विषयांऐवजी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय पर्यायी म्हणून निवडले. यावरून शक्तीची दृढ निर्णयक्षमता आणि समजूतदारपणा दिसून येत होता. त्यानंतर शक्तीने २०२४ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान मिळवून तिचे ध्येय साध्य केले. परीक्षेचा निकाल आल्यानंतर शक्तीच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.