कारकुनानेच लावला वीज खात्याला चुना
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
संशयित फरार : कर्मचार्यांच्या नावे बोगस खाती उघडून २८ लाख लाटले
कारकुनानेच लावला वीज खात्याला चुना
संशयित फरार : कर्मचार्यांच्या नावे बोगस खाती उघडून २८ लाख लाटलेबार्देस : म्हापसा वीज कार्यालयातील कनिष्ठ कारकून (एल.डी.सी.) विनोद वसंत मयेकर याने एप्रिल २०१४ पासून सहा जणांच्या नावे बॅँकेत बोगस खाते उघडून पगार म्हणून दर महिन्याला त्याच्या नावे खात्यातील पैसे वळवून आजपर्यंत सुमारे २८ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार या कार्यालयातील कनिष्ठ अभियंते आर. जी. देसाई यांनी म्हापसा पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा वीज कार्यालयात कामाला असल्याचे भासवून सहा जणांची बोगस नावे लेखा विभागाला पुरवून त्यांच्या नावे बँकेत खाती उघडून मयेकर याने एप्रिल २०१४ ते आतापर्यंत २८ लाख रुपये हडप केले. दरम्यान, मयेकर हा २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता असून त्याला कार्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. संशयित मयेकर याच्याकडे कर्मचार्यांचे पगार बॅँकेत जमा करण्याचे काम होते. याचा फायदा घेत त्याने एप्रिल २०१४ साली त्यानो सहा बोगस नावांची बॅँकेत खाती उघडली व त्या खात्यावर जमा झालेले पैसे परस्पर हडप केले. आतापर्यंत या खात्यांवर २८ लाख जमा करून ते पुन्हा काढले आहेत. याची माहिती गेल्या महिन्यात अकाउंट डिपार्टमेंटला मिळताच म्हापसा कार्यालयात माहिती दिली. त्याची चौकशी सुरू असतानाच मयेकर बेपत्ता झाला. त्यावर खात्याने त्याला निलंबित केले. तसेच म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत करीत आहेत. मयेकर याच्या शोधात म्हापसा पोलीस आहेत. (प्रतिनिधी)