कोट्यवधी रुपयांच्या वसुलीस संचालकांसह सचिव दोषी
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
एच.ए.एल. एम्प्लाईज सोसायटी अपहार : ४४ कोटींची जबाबदारी निश्चिती
कोट्यवधी रुपयांच्या वसुलीस संचालकांसह सचिव दोषी
एच.ए.एल. एम्प्लाईज सोसायटी अपहार : ४४ कोटींची जबाबदारी निश्चितीनाशिक : ओझर टाऊनशीप येथील ए.एच.एल. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत २००१ ते २०११ या काळात झालेल्या ४४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण करून तत्कालीन २४ संचालक आणि दोन सचिवांना दोषी धरल्याचे वृत्त आहे.एच.ए.एल. क्रेडीट सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून सोसायटी नवनिर्माण कृती समितीचे समन्वयक प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या नेतृत्वाखाली सभासद सातत्याने चौकशीची आणि जबाबदारी निश्चितीची मागणी सहकार विभागाकडे करीत होते. सहकार विभागाने त्यानंतर २००१ ते २०११ या दहा वर्षांच्या कालावधीचे फेर लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी मार्च २०१३ मध्ये बागलाण तालुका सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांना सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रकांत विघ्ने यांनी शुक्रवारी चौकशीचा अहवाल सादर केला. त्यात बॅँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट ठेव पावत्या बनवून केलेल्या १७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार, संस्था तोट्यात असताना एक कोटी १८ लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप करणे, ११ कोटी ५६ लाख रुपयांचा लाभांश वाटणे, समभागांची मूल्य उणे असताना १४ कोटी २१ लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप करणे आदि गैरप्रकार आढळून आल्याचे समजते. यात आजी-माजी संचालक मिळून २४ संचालकांवर व दोन सचिवांवर ठपका ठेवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी टाकल्याचे प्रवीण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)