व्यापारी संकुलातील गाळ्यांना सील महापालिका: थकबाकी वसुलीसाठी कारवाई
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी महापालिकेने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १४ गाळ्यांना मार्केट विभागाच्या पथकाने सील ठोकले. कारवाई टाळण्यासाठी काही गाळेधारकांनी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत कारवाई पूर्ण केली.
व्यापारी संकुलातील गाळ्यांना सील महापालिका: थकबाकी वसुलीसाठी कारवाई
अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी महापालिकेने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १४ गाळ्यांना मार्केट विभागाच्या पथकाने सील ठोकले. कारवाई टाळण्यासाठी काही गाळेधारकांनी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत कारवाई पूर्ण केली. शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची मागील १२२ आणि चालू ३६ अशी एकूण १५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील फक्त २१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने जप्तीची मोहीम सुरू केली. सावेडीतील महापालिकेच्या मालकीच्या सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील सात गाळ्यांना शुक्रवारी सील ठोकण्यात आले. शनिवारी प्रोफेसर कॉलनीतील आणखी सात गाळे सील करण्यात आले. मार्केट विभागाचे पथक सील ठोकण्याच्या कारवाईसाठी जाताच काही गाळेधारकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरली. प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळेधारकांनी राजकीय नेत्यांमार्फत पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेश घेतल्यानंतरच पथकाने तेथून पाय काढला. व्यापारी संकुलातील गाळेधारकांनंतर बड्या थकबाकीधारकांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाकडून त्यांना जप्तीपूर्व नोटीसा पाठविण्यात येत आहेत. जप्तीची कारवाई टाळून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)