High Court News: टिफिन बॉक्समध्ये नॉन व्हेज अर्थात मांसाहारी जेवण आणल्याचा ठपका ठेवत तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढून टाकलं. शाळेच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या आईंनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला असून, अमरोहा येथील शाळेत हा प्रकार घडला.
तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी डब्ब्यात नॉन व्हेज आणले होते. ही बाब मुख्याध्यापकांपर्यंत गेली. त्यांनी तिन्ही विद्यार्थ्यांच्या शाळेतून हकालपट्टी केली.
ही बाब घरी कळल्यानंतर मुलांच्या आईंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याचिककर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी इलाहाबाद उच्च न्यायालयाकडे केली.
शाळेच्या मुख्याध्यापकाने मुलांनी नॉन व्हेज जेवण आणण्यावर आक्षेप घेतला. इतकंच नाही, तर त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने शाळेतून काढून टाकले, असे याचिककर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती एस.सी. शर्मा यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने अमरोहाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, त्यांनी दोन आठवड्याच्या आत मुलांचे सीबीएसईशी सलग्नित दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊन द्यावा. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करावे.
१७ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, "पुढील सुनावणी ६ जानेवारी २०२५ रोजी होईल. अमरोहाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, तर पुढच्या तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे."