नवी दिल्ली : दिल्लीतीलमहिलांना दरमहा एक हजार रुपयांची मदत देण्यासाठी येत्या १०-१५ दिवसांत मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केली जाईल. यासाठी नोंदणी प्रक्रियेवर काम करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री आतिशी यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत महिलांना या योजनेअंतर्गत एक किंवा दोन हप्ते मिळतील,असेही त्या म्हणाल्या.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच, आप पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम वाढवून २,१०० रुपये केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. दरम्यान, शुक्रवारी पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाचे सरकारचे वचन पूर्ण झाले आहे. आम्ही महिलांना एक हजार रुपयांची मदत देण्याचे आमचे वचन पाळले आहे. या उपक्रमात अडथळे आणण्याचे विरोधकांचे सर्व प्रयत्न असूनही, आम्ही यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे.
महिलांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. छोट्या वैयक्तिक गरजांसाठी त्यांना कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही, याची काळजी घेणे आहे, असे अतिशी यांनी सांगतले. तसेच, या योजनेच्या पात्रतेबाबत आतिशी म्हणाल्या की, कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी, तसेच गेल्या आर्थिक वर्षात ज्या महिलांनी आयकर भरला आहे आणि आधीपासूनच कोणत्याही प्रकारची पेन्शनला लाभ घेणाऱ्या महिला, या योजनासाठी पात्र असणार नाहीत.
याचबरोबर, आतिशी यांनी सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या चांगल्या दर्जावर भाष्य केले. तसेच, त्यांनी मोहल्ला क्लिनिकद्वारे मोफत आरोग्य सेवेची तरतूद देखील नमूद केली, ज्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींशिवाय उपचार मिळू शकतील. याशिवाय, सरकार महिलांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देते. ज्यामुळे महिलांना शिक्षण, नोकरी किंवा नोकरीच्या शोधासाठी सहज प्रवास करण्यास मदत मिळते, असेही मुख्यमंत्री अतिशी यांनी सांगितले.