ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - सॅमसंगसारख्या ख्यातनाम कंपनीत उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले प्रणव मिस्त्री यांना टीम मोदींमध्ये स्थान हवे आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या टीममध्ये सामील करुन घेतल्यास सॅमसंगची नोकरी सोडून भारतात परतण्याची तयारी मिस्त्री यांनी दर्शवली आहे. जूनमध्ये मिस्त्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असून या भेटीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सिक्स्थ सेंस प्रणाली व सॅमसंग गॅलेक्सी गेअर या डिजीटल उपकरणांनी तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे प्रणव मिस्त्री हे सध्या सॅमसंग कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. कंपनीच्या रिसर्च टीम व भारतातील थिंक टॅँकचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. गुजरातमधील पालमपूर या गावात जन्मलेले ३३ वर्षीय प्रणव मिस्त्री सिलीकॉन व्हॅलीत असतात. मिस्त्री यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीमध्ये भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. मी मोदींच्या आदेशाची वाट बघत आहे. त्यांनी होकार दिल्यास मी त्यांच्या टीममध्ये सल्लागारपदावर काम करण्यास तयार असल्याचे मिस्त्री सांगतात. भारताची सेवा करण्याची माझी इच्छा असून देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चमत्काराने सर्वसामान्यांच्या जीवनात लाखपटीने सुधारणा करता येईल असा विश्वास ते व्यक्त करतात. मिस्त्री जूनमध्ये नरेंद्र मोदींना भेटणार असून या भेटीत मोदींनी होकार दिल्यास मी सिलीकॉन व्हॅलीतील माझ्या लॅबला रामराम करुन भारतात परतीन असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
मोदींनी होकार दिल्यास देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक नवे पर्वच सुरु होऊ शकेल. १९८० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीदेखील सॅम पित्रोदा यांच्या मदतीने देशात टेलिकॉम क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात केली होती. मोदीदेखील विज्ञान व तंत्रज्ञानाचे अनुकरण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. थ्रीडी सभा, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, गुगल हँगआऊट अशा अत्याधुनिक पर्यायांचा वापर करुन त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
मिस्त्री मोदींच्या कार्यशैलीने प्रभावित झाले आहेत. मिस्त्री म्हणतात, देशाच्या सेवेत मी जास्तीत जास्त कसे योगदान देऊ शकतो याविषयी मी मोदींशी चर्चा करीन. मला राजकारणात काडीमात्र रस नसून मला मंत्रिपदही नको. मी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयात सल्लागारपदावर उत्तमरित्या काम करु शकतो असे मिस्त्री आवर्जून सांगतात.