Salman Rushdie Book The Satanic Verses : प्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी यांची बहुचर्चित आणि वादग्रस्त कादंबरी 'द सॅटॅनिक व्हर्सेस' तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात परतली आहे. हे पुस्तक पुन्हा एकदा दिल्लीच्या बाजारात दिसले. या पुस्तकावर १९८८ मध्ये बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर न्यायालयाने आता या पुस्तकावरील बंदी उठवली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर विशिष्ट समाजात सलमान रश्दींविरोधात रोष निर्माण झाला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर ३६ वर्षांनंतर पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली आहे. बंदी उठल्यानंतर हे पुस्तक पुन्हा एकदा भारतातील बुक स्टँडवर दिसू लागले आहे.
बंदी का घातली?
राजीव गांधी यांच्या सरकारने १९८८ मध्ये या पुस्तकावर भारतात बंदी घातली होती. एका विशिष्ट समुदायाला ते 'निंदनीय' वाटल्याचे सांगत सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, दिल्लीउच्च न्यायालयाने सलमान रश्दीच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावरील बंदी उठवली असून, या पुस्तकावर बंदी घालण्यात आलेली १९८८ची मूळ अधिसूचना सरकार सादर करू शकलेले नाही. बाहरीसन्स बुकसेलरने सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्टदेखील केली आहे.
बंदी उठवताना काय म्हणाले दिल्ली हायकोर्ट?
५ नोव्हेंबरला भारतात पुस्तकाच्या आयात बंदीला आव्हान देणाऱ्या २०१९ च्या खटल्याची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, भारत सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की आयात बंदीचा आदेश नाही आणि त्यामुळे तो न्यायालयात सादर करता येणार नाही. यावर, न्यायालयाने सांगितले की 'पुस्तकावर बंदी घालणारी अशी कोणतीही अधिसूचना अस्तित्वात नाही हे मानण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नाही. याचिकाकर्ते संदीपान खान यांचे वकील उद्यम मुखर्जी यांनी सांगितले की, बंदीबाबत कोणतीही अधिसूचना नसल्याने ५ नोव्हेंबर रोजी बंदी उठवण्यात आली आहे.
पुस्तकावरून काय वाद झाला?
सलमान रश्दींचे हे पुस्तक काल्पनिक जगावर आधारित आहे. 'द सॅटॅनिक व्हर्सेस' सप्टेंबर १९८८ मध्ये प्रकाशित झाले होते, परंतु त्याच्या प्रकाशनानंतर लगेचच हे पुस्तक वादात सापडले. या पुस्तकात प्रेषित मोहम्मद यांच्यावरील काही उतारे कथितपणे 'निंदनीय' म्हणून वर्णन केले गेले होते. हे पुस्तक वाचनात आल्यानंतर मुस्लीम समाजात संतापाची लाट उसळली होती आणि त्यामुळे राजीव गांधींच्या सरकारने या पुस्तकाच्या आयातीवर बंदी घातली होती.
बंदी व्यतिरिक्त या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर, वाद इतका वाढला की इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा काढला होता, ज्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना त्यांची हत्या करण्याचे आवाहन केले. ऑगस्ट २०२२ मध्ये, सलमान रश्दी यांच्या पुस्तकाविरोधात इतका जनक्षोभ निर्माण झाला होता की न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानादरम्यान स्टेजवर त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली.