लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य खात्याची वेबसाइट हॅक करण्यामागे रशियातील एका हॅकर गटाचा हात आहे, अशी माहिती एका सायबर सिक्युरिटी कंपनीतील तज्ज्ञांनी दिली आहे. देशातील सर्व रुग्णालयांची, तेथील प्रमुख डॉक्टर, कर्मचाऱ्यांची, आरोग्य सुविधांची माहिती या वेबसाइटवरून आपण चोरली आहे, असा दावा या हॅकरनी केला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याची वेबसाइट हॅक करून त्यातील सर्व माहिती रशियन हॅकरच्या फिनिक्स या गटाने चोरल्याची घटना नुकतीच घडली. ही माहिती क्लाऊडसेक या सायबर सिक्युरिटी कंपनीने दिली. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून जी-२०ने घातलेले निर्बंध तसेच इंधन तेलाच्या किमतीबाबत भारताने केलेला करार या दोन गोष्टींमुळे आम्ही केंद्र सरकारच्या एका खात्याच्या वेबसाइटला लक्ष्य केले, असा दावा फिनिक्स या हॅकर गटाने केला. रशियावर पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांचा भंग न करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
फिनिक्स गटातील हॅकरच्या कारवाया
रशियातील फिनिक्स हा हॅकर गट जानेवारी २०२२ पासून सक्रिय आहे. या गटाने काही बँकांतील खातेदारांचे पासवर्ड चोरले तसेच त्यांच्या इ-पेमेंट व्यवहारांत शिरकाव करून अनेक गैरकृत्ये केली आहेत. लोकांचे चोरीला गेलेले किंवा हरविलेले आयफोन अनलॉक करणे व ते किव्ह, खारकीव येथील लोकांना विकण्याचे उद्योगही फिनिक्स गटाकडून सुरू असतात. याआधी फिनिक्स गटाने जपान, ब्रिटनमधील रुग्णालयांची माहिती चोरली होती. (वृत्तसंस्था)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"