आर.आर. प्रतिक्रिया- भाग १
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
नम्र स्वभावाचा राजकारणी गेला
आर.आर. प्रतिक्रिया- भाग १
नम्र स्वभावाचा राजकारणी गेला- मान्यवरांची शोकसंवेदना : नागपूर : माजी मंत्री आर.आर. पाटील यांच्या रूपात विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेले नेतृत्व आणि मोकळं व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेल्याची खंत मान्यवरांनी व्यक्त केली. राजकारणात आबांसारखे नि:स्पृह नेते आणि मित्र लाभणे हे खरोखरच भाग्याचे असते. नम्र स्वभावाचा सर्वसमावेशक राजकारणी अशी आबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहील, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचा चेहरा हरपला - अनिल देशमुखमाजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. त्यांच्या रूपात राष्ट्रवादीचा एक चेहरा हरपला आहे, अशी खंत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. विनम्रता, उत्कृष्ट वक्ते, सामाजिक व राजकीय जाण आणि प्रचंड अभ्यासू व मेहनती प्रवृत्ती ही आबांच्या जमेची बाजू होती. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आबांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. संपूर्ण महाराष्ट्रात डान्सबार बंदी राबविली. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली, असेही देशमुख म्हणाले. विकासाचे राजकारण करणारा नेता : कृष्णा खोपडेराजकारणाचा वापर समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक कसा करून घेता येईल, याचा सतत विचार करणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. आबा विरोधकांनाही विश्वासात घ्यायचे. लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात १२ मजली संकुल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. सामान्यांचा आवाज हरपला : चतुर्वेदीमहाराष्ट्रातील गरीब, उपेक्षित लोकांचे खरे समर्थक व त्यांची बाजू समजून घेणारे व्यक्तिमत्त्व आबांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड झाले आहे. मंत्री असतानाही ते सामान्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात आवाज उठवायचे. पक्षीय राजकारणाच्या सीमा ओलांडत त्यांनी काम केले. संपूर्ण महाराष्ट्र एका प्रामाणिक नेत्याच्या रूपात आर.आर. पाटील यांना कायम स्मरणात ठेवेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.