कानपूर: पंजाब नॅशनल बँकेतील 11,400 कोटींच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काहीवेळातच सीबीआयकडून विक्रम कोठारी यांच्या निवासस्थानासह कानपूरमधील तीन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. अलहाबाद बँकेकडून कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सध्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून विक्रम कोठारी यांची त्यांच्या पत्नी आणि मुलासह चौकशी सुरू असल्याचे कळते.विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओवरसीज बँक आणि यूनियन बँक ऑफ इंडिया या बँकांकडून हे कर्ज घेतले आहे. यूनियन बँकेकडून त्यांनी ४८५ कोटींचे कर्ज घेतले असून अलाहाबाद बँकेकडून ३५२ कोटींचे कर्ज घेतले आहे. वर्षभरापासून त्यांनी व्याज वा मूळ कर्ज परत केलेले नाही. कानपूरमधील मध्यवर्ती भागातील कोठारी यांचे कार्यालय गत आठवड्यापासून बंद आहे. तेव्हापासून कोठारी हे कोठे आहेत याबाबतत माहिती नव्हती. मात्र, कोठारी यांनी मी कुठेही पळून गेलो नसून कानपूरमध्येच असल्याचे स्पष्ट केले. मी बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, मी त्याची परतफेड करत नसल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी सध्या कानपूरमध्येच असून याठिकाणीच राहणार आहे. मला जगभरात भारतापेक्षा कोणताही देश चांगला वाटत नाही. त्यामुळे मी कुठेही पळून जाणार नसल्याचे कोठारी यांनी सांगितले होते.
'रोटोमॅक'च्या विक्रम कोठारींवर गुन्हा दाखल; सीबीआयने घरावर टाकला छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 13:29 IST