दिल्ली न्यायालय : क्रूर पतीला तीन वर्षांचा कारावास
नवी दिल्ली : पत्नीला आनंदी ठेवण्यासह तिची घरात आणि बाहेर सुरक्षेची जबाबदारी पतीची असते, असे ठामपणे सांगत दिल्ली न्यायालयाने एका इसमाला पत्नीशी क्रूरपणे वागल्याबद्दल तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पत्नीची दररोज मानसिक आणि शारीरिक छळवणूक करताना तो एखाद्या हिंस्र श्वापदासारखा वागत होता, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीणसिंग यांनी म्हटले. सदर महिलेचा २0१२ मध्ये जळून मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने केलेल्या आरोपांवरून या इसमाला अटक झाली होती. लग्न करून पत्नीला घरी आणल्यानंतर तिला आनंदी ठेवण्यासह घरातील आणि बाहेरील धोक्यांपासून तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी पतीची असते.
या प्रकरणात पतीने या विश्वासाला तडा दिला. तो तिला दररोज मारहाण करीत क्रूरपणे वागत होता. त्याने पतीला केवळ शारीरिक पीडाच नव्हे तर तिचा मानसिक छळही केला. तिच्या मृत्यूपर्यंत तो तिला छळत होता, असे न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावताना म्हटले.
तथापि पत्नीला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केल्याच्या आरोपातून त्याला निर्दोष ठरविले. या घटनेत आत्महत्येचा प्रयत्न नसून एक अपघातच जास्त दिसतो. महिलेने आत्महत्या केल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचण्याजोगे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे त्याला आत्महत्येला प्रोत्साहित केल्याबद्दल दोषी ठरवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशी घडली घटना
- मे २0१२ मध्ये सदर महिलेला भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारावर तिच्या पतीला डिसेंबर १२ मध्ये अटक झाली. त्याच्यावर क्रूर छळवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. सुनावणीच्यावेळी पतीने सर्व आरोप फेटाळले होते.
(प्रतिनिधी)