नवी दिल्ली : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या प्रयत्नांतर्गत बुधवारी दिल्लीत पोहोचलेले हार्दिक पटेल यांनी आपले आंदोलन देशभर पोहोचविण्याची घोषणा केली. अधिग्रहित जमीन परत देण्याची मागणी करणाऱ्या गुज्जर समुदायास पाठिंबा जाहीर करीत त्यांनी आपल्या आंदोलनास धार देण्याचे मनसुबे जाहीर केले.पटेल समुदायाला ओबीसी कोट्यांतर्गत आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन छेडणारे हार्दिक पटेल बुधवारी दिल्लीत पोहोचले. याठिकाणी त्यांनी गुज्जर, कुर्मी अशा विविध जातींच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर या सर्वांनी ‘अखिल भारतीय पटेल नवनिर्माण सेना’ या छत्राखाली एकत्र येत एकमेकांच्या अधिकार व मागण्यांसाठी लढण्याची घोषणा केली. मी दिल्लीला आलो तेव्हा आमच्या गुज्जर बंधूंची जमीन कवडीमोल भावाने अधिग्रहित केली गेली व नंतर तिथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्याचे मला कळले. आता या गुज्जर बंधूंसाठी आम्ही लढणार आहोत. ज्या जमिनीवर अद्याप काम होऊ शकले नाही, ती जमीन गुज्जर बंधूंना परत मिळायला हवी, असे हार्दिक पटेल यावेळी म्हणाले. गुज्जरांची जमीन परत देण्याच्या मागणीसाठी रामलीला मैदानावर एक रॅली घेतली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मात्र या रॅलीची तारीख त्यांनी सांगितली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आरक्षण आंदोलन देशभर छेडणार
By admin | Updated: October 1, 2015 00:16 IST