Republic Day 2026: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आज अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य संचलनासाठी दिल्ली पोलिसांनी बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा लागू केली असून, संपूर्ण शहरात ३० हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आहे. यंदाची सुरक्षा व्यवस्था केवळ मानवी बळावर अवलंबून नसून, तिला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
विना इंटरनेट चालणारे AI ग्लासेस
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिल्ली पोलिसांनी प्रथमच वापरलेले AI-enabled स्मार्ट ग्लासेस. हे अत्याधुनिक चष्मे घातलेले पोलीस कर्मचारी गर्दीत फिरताना संशयितांची ओळख अवघ्या काही सेकंदात पटवू शकतील. या चष्म्यांमध्ये फेस रिकग्निशन आणि थर्मल इमेजिंग सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गुन्हेगाराने मास्क लावला असेल, दाढी वाढवली असेल किंवा मेकअप करून वेष बदलला असेल, तरीही हे चष्मे त्याच्या चेहऱ्याची ठेवण ओळखून पोलिसांना लगेच सावध करतील. २० वर्षांपूर्वीच्या जुन्या फोटोच्या आधारेही ही सिस्टीम गुन्हेगाराची ओळख पटवण्यास सक्षम आहे.
विना इंटरनेट चालणार सुरक्षित यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व स्मार्ट ग्लासेस आणि फेस रिकग्निशन कॅमेरे इंटरनेटला जोडलेले नाहीत. प्रत्येक डिव्हाइसमध्ये स्वतःचा एन्क्रिप्टेड डेटाबेस असून तो मोबाईल फोनमध्ये स्टोअर आहे. यामुळे डेटा लीक होण्याचा किंवा सायबर अटॅकचा धोका पूर्णपणे टळला आहे. नेटवर्क नसतानाही ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असल्याने सुरक्षा अधिक चोख झाली आहे.
३० कंट्रोल रूममधून बारीक नजर
नवी दिल्लीच्या हाय-सिक्युरिटी झोनमध्ये सुमारे १० हजार जवान तैनात असून, संपूर्ण परेड मार्गावर ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्यात आले आहे. प्रगत व्हिडिओ ॲनालिटिक्सने सज्ज असलेल्या या कॅमेऱ्यांच्या थेट देखरेखीसाठी ३० नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत, जिथे १५० हून अधिक तज्ज्ञ कर्मचारी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून हजारो इमारतींच्या छतावर स्नायपर तैनात करण्यात आले असून हवाई धोक्यांपासून संरक्षणासाठीही विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचा मोठा निर्णय
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता दिल्ली मेट्रोने आज पहाटे ३ वाजल्यापासूनच सेवा सुरू केली आहे. सकाळी ६ वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी ट्रेन चालवल्या जात आहेत. दरम्यान, विजय चौक ते लाल किल्ला या परेड मार्गावर सर्व प्रकारचे ट्रॅफिक बंद करण्यात आले असून, दुपारी २ वाजेपर्यंत इंडिया गेट परिसरात सर्वसामान्य वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. टिळक मार्ग आणि बहादूर शाह जफर मार्ग यांसारख्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही सकाळी १०:३० नंतर वळवण्यात आली आहे.
दरम्यान, शांततापूर्ण आणि भव्य वातावरणात हा सोहळा पार पडावा, यासाठी दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Delhi heightened Republic Day security with AI smart glasses for suspect identification and 30,000 personnel. The AI system operates offline, protecting against cyber threats. Extensive CCTV coverage and traffic diversions are also in place for a safe celebration.
Web Summary : दिल्ली में गणतंत्र दिवस पर सुरक्षा कड़ी की गई। संदिग्धों की पहचान के लिए एआई स्मार्ट चश्मे और 30,000 जवान तैनात हैं। एआई सिस्टम ऑफलाइन काम करता है, जिससे साइबर खतरे से सुरक्षा होती है। सुरक्षित समारोह के लिए सीसीटीवी निगरानी और यातायात परिवर्तन भी किए गए हैं।