नवी दिल्ली/ तिरुअनंतपुरम: केरळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना देण्यात आलेले निमंत्रण परत घेतल्याने मोठे वादंग निर्माण झाले आहे. हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला असून संसदेतही सोमवारी या मुद्यावर प्रचंड गदारोळ झाला.पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर प्रथमच केरळच्या दौऱ्यावर जात असलेले मोदी मंगळवारी कोल्लाम येथे मागास हिंदू समुदाय एझवांची संघटना श्री नारायण धर्म परिपालना योगमतर्फे (एसएनडीपी) आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आर.शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री चांडी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये हा निर्णय म्हणजे एक अत्याधिक दु:खद अनुभव असून राज्यातील जनतेचा अपमान असल्याची खंत व्यक्त केली. या मुद्यावरून लोकसभेत काँग्रेस भाजपा सदस्यांत वाक्युद्ध झाले. पंतप्रधान राजकीय सूड उगविण्यासाठी संवैधानिक पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. परंतु गृहमंत्री राजनाथसिंग यांनी हा आरोप निराधार ठरविला. दरम्यान एनएनडीपीचे प्रमुख वेल्लापल्ली नातेसन यांनी या समारंभातून चांडी यांचे नाव हटण्यास ते स्वत:च जबाबदार असून भाजपा नेतृत्व नाही असा दावा केला. (वृत्तसंस्था)
मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण परत घेतल्याने वादंग
By admin | Updated: December 15, 2015 03:07 IST