ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. विदेशातील बँकांमध्ये दडवलेल्या काळा पैशावरुन सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच केंद्र सरकार या दिशेने योग्य पाऊल उचलत असल्याचे सांगत मोदींनी सरकारची पाठराखणही केली.
रविवारी सकाळी रेडिओवर 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. काळा पैसा परत आणण्यासाठी विभिन्न मार्ग असू शकतात व त्यावरुन मतभेदही असतील, पण आम्ही काळा पैसा परत आणू, जनतेने त्यांच्या प्रधान सेवकावर विश्वास ठेवावा असे मोदींनी सांगितले. विकलांग मुलांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय विशेष योजना राबवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. या योजनेंतर्गत एक हजार विकलांग मुलांना स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच सर्व केंद्रीय विद्यालय आणि विद्यापीठांना एक लाख रुपये देणार असून याद्वारे त्यांनी अपंग मुलांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावात असे मोदींनी स्पष्ट केले.
स्वच्छता अभियान जन आंदोलनाचे रुप घेत असून याचा चांगला परिणाम दिसत आहे. लहान शाळकरी मुलंही स्वच्छता अभियानात सहभागी होतात हे दिलासादायक चित्र असल्याचे मोदींनी नमूद केले. देशातील तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून सोडवायचे असून पुढील महिन्यातील 'मन की बात'मध्ये याविषयी भाष्य करु, यासंदर्भात जनतेने त्यांच्या सुचना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहनही मोदींनी केले.